Sir Ratan Tata Trust Board : टाटा समुहाचे नेतृत्व हाती घेतल्यानंतर अध्यक्ष नोएल टाटा यांनी आपली ताकद वाढवायला सुरुवात केली आहे. आता पुन्हा एकदा टाटा समूहाच्या सत्तेचे केंद्र असलेल्या 'टाटा ट्रस्ट्स'मध्ये लवकरच मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. नोएल टाटा यांचे चिरंजीव नेव्हिल टाटा यांना 'सर रतन टाटा ट्रस्ट'च्या बोर्डावर समाविष्ट केले जाण्याची दाट शक्यता असून, या आठवड्याच्या शेवटी होणाऱ्या ट्रस्टच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब होऊ शकते. या निर्णयामुळे नोएल टाटा यांची ट्रस्टवरील पकड अधिक मजबूत होईलच, शिवाय ३२ वर्षीय नेव्हिल टाटा यांचा समूहातील प्रभावही वाढणार आहे.
नेव्हिल टाटा : टाटा साम्राज्याचा नवा चेहरा?
नेव्हिल टाटा यांची गणना आता टाटा समूहातील अत्यंत प्रभावशाली व्यक्तींमध्ये केली जात आहे. त्यांच्याकडे आधीच अनेक महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या आहेत. गेल्या वर्षीच त्यांची सर दोराबजी टाटा ट्रस्ट या मुख्य ट्रस्टच्या बोर्डावर नियुक्ती करण्यात आली होती. 'ट्रेंट' अंतर्गत येणाऱ्या स्टार बाजारच्या हायपरमार्केट व्यवसायाचे ते प्रमुख आहेत. जेआरडी टाटा ट्रस्ट, टाटा सोशल वेलफेयर ट्रस्ट आणि आरडी टाटा ट्रस्टमध्ये ते विश्वस्त म्हणून कार्यरत आहेत.
सत्तेचे समीकरण आणि '५१ टक्के' वाटा
टाटा समूहाची होल्डिंग कंपनी असलेल्या 'टाटा सन्स'मध्ये 'सर दोराबजी टाटा ट्रस्ट' आणि 'सर रतन टाटा ट्रस्ट' यांची एकत्रित भागीदारी ५१ टक्क्यांहून अधिक आहे. ऑक्टोबर २०२४ मध्ये रतन टाटा यांच्या निधनानंतर ट्रस्टने ७५ वर्षांवरील नॉमिनी डायरेक्टर्ससाठी दरवर्षी फेरनियुक्तीचा नियम आणला आहे. नेविल टाटांचा बोर्डातील प्रवेश हा समूहाच्या भविष्यातील नेतृत्वाची नांदी मानली जात आहे.
अंतर्गत वाद आणि सरकारी हस्तक्षेप
गेल्या काही महिन्यांपासून टाटा ट्रस्ट्सच्या बोर्डातील अंतर्गत वाद चर्चेत राहिले आहेत. माजी संरक्षण सचिव विजय सिंह यांची टाटा सन्सच्या बोर्डावर पुन्हा नियुक्ती करण्याला काही ट्रस्टींनी विरोध केला होता, ज्यानंतर सरकारला या प्रकरणात हस्तक्षेप करावा लागला. सर दोराबजी टाटा ट्रस्टचे विश्वस्त प्रमित झवेरी यांचा कार्यकाळ ११ फेब्रुवारीला संपत असून, तो पुन्हा रिन्यू होणार का, याकडे सर्वांचे लक्ष आहे.
वाचा - कोट्यवधींच्या रॉल्स रॉयसच्या दरात मोठी सवलत? किमतीत ४० टक्क्यांपर्यंत घटीची शक्यता
बोर्डातून काही बडे चेहरे बाहेर पडणार?
मीडिया रिपोर्ट्सनुसार, नोएल टाटा यांचे अध्यक्ष म्हणून स्थान अधिक भक्कम झाले असून, बोर्डातील काही जुन्या विश्वस्तांना बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो. दरम्यान, जहांगीर एचसी जहांगीर हे 'आजीवन विश्वस्त' असल्यामुळे त्यांचे स्थान कायम राहील. डॅरियस खंबाटा यांचा कार्यकाळ या वर्षाच्या शेवटी संपणार असल्याने, त्यांच्या फेरनियुक्तीबाबतही चर्चा सुरू आहे.
